‘घरीच मूर्ती विसर्जन साठी पावडर मोफत’

मूर्ती विसर्जन-Ganesh-Festival-ganeshotsav
मूर्ती विसर्जन

पुणे  – गणेशोत्सवात “श्रीं’च्या मूर्ती विसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुणेकरांनी घरच्या घरी मूर्ती विसर्जन करावे, यासाठी अमोनियम बायकार्बोनेटची पावडर (खाण्याचा सोडा) मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली. त्यासाठी शंभर टन पावडरची व्यवस्था करण्यात येणार असून, महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हौदांमध्येही ते टाकण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

शहरातील नागरिकांना “श्रीं’च्या मूर्ती विसर्जन घरी करता यावे, यासाठी गेल्या वर्षीपासून महापालिका आणि विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नागरिकांना “अमोनियम बायकार्बोनेट’ची पावडर देण्यात येते. गेल्या वर्षी शंभर टन पावडरची खरेदी केली होती. “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि कमिन्स इंडिया यांनी विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती महापौरांनी दिली. “एनसीएल’च्या शुभांगी उंबरकर, अतुल महाजन, जनवाणीचे रवी पंडित, कमिन्सच्या सौजन्या वैगरू, अवंती कदम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहआयुक्त सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते.

“”गणेश विसर्जनासाठी यंदा 101 टन पावडर खरेदी केली आहे. त्यात गेल्या वर्षीचे 15 टन पावडर शिल्लक आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि मूर्ती विक्रेत्यांकडे ही पावडर उपलब्ध असेल. मूर्तीनुसार किती पावडरची आवश्‍यकता आहे, याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत,” असेही महापौरांनी सांगितले.

शहरात “श्री’ च्या विसर्जनसाठी 255 ठिकाणे
विसर्जन घाट :57
कॅनॉलवर विसर्जन व्यवस्था :35
लोखंडी हौद : 110

अवश्य वाचा – गणपती उत्सव – चिनी वस्तूंकडे पुणेकरांनी फिरवली पाठ

हौद बुजविताना छायाचित्रण करावे 
गणेश मूर्ती विसर्जन साठी महापालिकेच्या विविध जागांवर विसर्जन हौद उभारण्यात येतात. त्यामुळे नागरिकांची सोय होते. मात्र, गणेशोत्सवानंतर हौद बुजविण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने केली जाते. परंतु, ते बुजविताना हौदात गणेशमूर्ती असतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या पार्श्‍वभूमीवर विसर्जन हौद बुजविताना त्याचे छायाचित्रण करावे, अशी मागणी नगरसेवक विशाल तांबे यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात तांबे यांनी महापौरांना पत्र दिले आहे.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here