श्रीगोंदा तालुक्याला केंद्र सरकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

महाराष्ट्र बुलेटिन : श्रीगोंदा तालुक्यात केंद्र सरकारचा निधी कमी पडू देणार नाही. श्रीगोंदा तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागले असून यापुढेही कामांची शृंखला अशीच वाढत जाईल असे प्रतिपादन अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

काल खासदार विखेंचा धावता दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि तालुक्यात कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

या दरम्यानच त्यांनी काष्टी येथील दौरा आटोपला आणि लिंपणगाव येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली व रस्त्याच्या प्रलंबित कामांबाबत संबंधित ठेकेदारांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लिंपणगावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन देखील घेतले. सदर वेळी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचे स्वागत केले व सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात पंचक्रोशीतील निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गाव परिसरातील विविध विकासकामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाने एका निवेदनाद्वारे खासदार डॉ. सुजय विखेंकडे सादर केले.

दरम्यान गावाचे उपसरपंच अरविंद कुरुमकर, महिला सरपंचांचे पती उदयसिंह जंगले यांनी निदर्शनास आणून दिले की, लिंपणगावातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी जात असून गावातील लोकसंख्या अधिक असल्याकारणाने पाण्याचा निचरा अधिक प्रमाणात होतो. विशेष म्हणजे गाव उंच ठिकाणावर असून निचरा झालेले सर्व पाणी रस्त्यावर येत असून भविष्यात यामुळे अपघात होऊ शकतात. या अनुषंगाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त गटार लाईन व स्ट्रीट लाईटची सुविधा संबंधित ठेकेदारांकडून करण्यात यावी याबाबत सूचना देण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांचे निवेदन खासदार विखे यांना देण्यात आले.

सदर वेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, काष्टी-लिंपणगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पुढारी कमी असल्याने हे काम दर्जेदारपणे होत आहे. तसेच लिंपणगावकरांची रस्त्याबाबतची अडचण ही रास्त असून संबंधित ठेकेदारांनी यामध्ये लक्ष घालून गावकऱ्यांच्या अडचणी मार्गी लागतील या अनुषंगाने काम करावे अशा सूचना ठेकेदारांना दिल्या. तसेच रस्त्यांचा विकास करताना अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी उपस्थितांना दिले.

यावेळी काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, केशवराव मगर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब गिरमकर, उपसरपंच अरविंद कुरुमकर, महिला सरपंचांचे पती उदयसिंह जंगले, हरिभाऊ कुरुमकर, निळकंठ जंगले, प्रवीण कुरुमकर, मेजर प्रकाश चव्हाण, पोपटराव माने, भाऊसाहेब भगत, नेमीचंद बाबर, काकासाहेब रोडे, शरद वेताळ, जयसिंग शेंडे, बापूराव रेवगे आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी अनिल जगताप व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here