Pune : नगरसेवकांच्या प्रश्नांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

Pune : नगरसेवकांच्या प्रश्नांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी | officials of mahamatro raided by of the corporators

शहरातील बहुचर्चित महामेट्रोच्या कामाबाबत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना महामेट्रोच्या अधिका-यांची चांगलीच तारांबळ उडाली. मेट्रो प्रकल्पासाठी पालिकेने किती जागा दिली? कचरा डेपोची जागा नेमकी किती? प्रकल्पासाठी किती खासगी जागा धान्य गोदामापर्यंत लागणार? यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे महामेट्रो अधिकाऱ्यांना देता आली नाही.

शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामाबाबत लेखी प्रश्न उपस्थित केले होते. त्यात प्रामुख्याने डेक्कन ते वनाज या मार्गावरील किती जागा मेट्रो ताब्यात घेणार असे प्रश्न विचारले. मात्र, मेट्रोकडून उपस्थित असलेले जनसंपर्क अधिकारी आणि इतर एका अधिकाऱ्याला या विषयी काहीच उत्तर देता आले नाही. नगरसेवकांनी विचारली तेवढीच माहिती आणली आहे. इतर माहिती नाही, असे उत्तर देण्याची वेळ महामेट्रोच्या अधिका-यांवर आली.

त्यामुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, यापुढे पूर्ण माहिती घेऊनच सभागृहात यावे, अशा सूचनाही यावेळी मेट्रोच्या अधिका-यांना देण्यात आल्या. सर्वसाधारण सभेत झालेल्या या गोंधळाची गंभीर दखल घेत, मेट्रोचे अधिकारी अशाप्रकारे सभागृहाचा वेळ घालवतात आणि माहिती देत नाहीत, याबाबत प्रशासनाने महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना तातडीने पत्र पाठविण्याच्या सूचना आयुक्तांना महापौर मुक्ता टिळक यांनी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here